
Maharashtra Budget राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून करण्यात आला. तसेच या अर्थसंकल्पातून देवेंद्र फडणवीस यांनी महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत जाहीर केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीस्कर प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ” कालच महिला दिन साजरा झाला. महिला सक्षमीकरणाच्या जोरावरच देशाची प्रगती ठरते. त्यासाठी चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
महिलांसाठी ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना
शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. तसेच लैंगिक शोषणातून मुक्त झालेल्या, कौटुंबिक समस्या असलेल्या महिलांसाठी ‘स्वाधार’ आणि ‘उज्वला’ या दोन योजनांचे एकत्रीकरण करून केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत पीडित महिलांना निवारा, कायदेशीर सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन आणि इतर सेवा पुरविल्या जातील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हेही वाचा- Maharashtra Budget! राज्याच्या अंगणवाडी सेविकांसह शिक्षकसेवकांच्या मानधनात मोठी वाढ
फडणवीस यांची अंगणवाडी सेविकांच्या संदर्भात महत्त्वाची घोषणा
फडणवीस यांनी अंगणवाडी सेविकांच्या संदर्भातही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. अंगणवाडी सेविकांचे मानधन रु.8325 वरून रु.10 हजार करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरून 7200 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यासोबतच अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4435 वरून 5500 रुपये आणि अंगणवाडी, मिनीची 20 हजार पदे वाढवण्याची घोषणा केली. अंगणवाडी सेविका, मदतनीस भरल्या जातील.